सामान्य माणसाचे जिणे अत्यंत मुश्लील बनले आहे. त्याचे जिणे सुलभ व्हावे, याकरता यंत्रणा काहीच करत नाहीत. राजकारण्यांना केवळ त्याच्या मतांमध्ये स्वारस्य असते.
मी एक सामान्य माणूस, सर्वार्थाने! मी नाकासमोर चालतो. वेळेवर ऑफिसला पोहोचतो. ट्रेन लेट असू शकतील, म्हणून वेळेपेक्षा अंमळ लवकरच घर सोडतो, लेटमार्कच्या भीतीने. रेल्वे स्टेशनवर पोहोचवणारी बस खच्चून भरलेली असते, फक्त त्यात शिरायला मिळो, एवढीच माझी अपेक्षा असते. स्टेशनवरून बाहेर पडताना मला फूटपाथवर चालणाऱ्यांपेक्षा ठाण मांडून बसलेले फेरीवाले दिसतात. मी रस्त्यावरून गाड्या चुकवत चालत राहतो. माझ्या आजुबाजूने जाणारे बाइकवाले माझ्याकडे रागारागाने बघत, काहीतरी पुटपुटत हॉर्न वाजवत जातात… मी भराभर पावलं टाकत ऑफिस गाठतो… नेहमीसारखाच मी वेळेपेक्षा १५ मिनिटे लवकर ऑफिसला पोहोचतो. ऑफिस सुनसान… नेहमीप्रमाणेच ! मी फायली हातावेगळी करायला सुरुवात करतो… हळूहळू ऑफिसमधली वर्दळ वाढायला लागते… मी कामात गर्क… बॉसने सांगितलेली फाइल पटकन पूर्ण करायच्या घाईत… त्याच बिल्डरची फाइल नेहमीच प्राधान्यक्रमाने कशी पूर्ण केली जाते, अशा पद्धतीचे मनात उमटणारे प्रश्न मी बाजूला सारतो, त्याबद्दल कधी कुणालाच विचारत नाही. मी दिलेलं काम चोख पूर्ण करतो. स्टेशनकडे वळणाऱ्या गर्दीत मीही एक असतो. तुडुंब भरलेल्या गाडीत धक्के खात गर्दी मला चढवते. खांद्याला हिसके बसतात. कुणाची तरी बॅग डोक्यावर आदळलेली असते, पण भांडण्याचे त्राण माझ्यात नसते. कुणाचीच चूक नाही, ना त्यांची, ना माझी ! ही स्थितप्रज्ञता माझ्यात शिरलेली असते.
फूटपाथ तुटके-फुटके का? रस्त्यावर इतके खड्डे का? ट्रेन्स का उशिरा धावत्येय? दररोज दीड-दोन तास ट्रॅफिकमध्ये का अडकायला होतं? ऑफिसच्या व्यवहारात बॉस करत असलेली अफरातफर इतर कुणाच्या का लक्षात येत नाही? हे आणि असे खूप सगळे प्रश्न विचारून विचारून थकून गेलोय… माझा रोजचा दिवस बदलत नाही, पुन्हा दुसरा दिवस माझ्यासाठी तसाच उगवणार आहे.
हे प्रश्न सोडवण्याची पत ज्यांची आहे, त्यांच्यापर्यंत माझाच काय, माझ्यासारखा हजारोंचा आवाज पोहोचत नाही. त्यांना आमचे म्हणणे ऐकण्याचे काही कारण नाही, कारण आमचं आयुष्य जरासं बरं केल्याने त्यांना काही मिळणार नाही. लोकांच्या जीवावर गब्बर होत, त्यांच्यासाठी काही न करता पाच वर्षांनी पुन्हा मत मागायला दारावर यायलाही त्यांना लाज वाटत नाही…. हे सारे प्रश्न तिथपर्यंत पोहोचतात… प्रश्नांचं मूळ आणि कूळ सारं तिथे आहे, हे मला कळलंय. माझ्यासारखा प्रत्येक कॉमन मॅन फक्त एक-दुसऱ्याशी भांडतो, एकमेकांवर आरोप-प्रत्यारोप करतो, आपल्या आयुष्यातील समस्येला दुसऱ्याला कारणीभूत ठरवतो… कारण या पलीकडे तो त्याच्या प्रॉब्लेम्सबाबत काहीच करू शकत नाहीत… ते सोडवणं त्याच्या- माझ्या नियंत्रणाच्या बाहेर आहे आणि सामान्यांचे प्रॉब्लेम्स सोडवून त्यांना सुखात ठेवणं हे राजकारण्यांना परवडणारं नाही. असं झालं, तर मग निवडणुकीत राजकीय पक्ष प्रलोभनं तरी काय दाखवणार आणि मतं तरी कशी मिळवणार? लोक खितपत राहणं, अस्वस्थ असणं, समाज धुमसत असणं… हे सगळं कसं राजकारण्यांच्या पथ्यावर पडणारं असतं… एकेका आंदोलनातून एकेकाची करिअर बनते, बिघडते हे ठाऊक नाही का तुम्हाला?मग काय, भोगा तुमचे भोग… करा ढिगभर कष्ट, न संपणारे; आणि त्या बदल्यात मिळवा पैसे सहज संपणारे! करत राहा उद्याची चिंता… बघा स्वप्न घराचं, मुलाबाळांच्या उज्ज्वल भविष्याचं… हा, असं स्वप्न तुम्ही नक्कीच बघू शकता ! कधीतरी मन पेटून उठतं आणि विचारावसं वाटतं- है कोई माई का लाल, जो हमारी जिंदगी बदल दे !
आणखी वाचा – आपल्यातील ऊर्जेला मुक्त करा