कृषि क्षेत्रातील सरकारच्या अवाजवी हस्तक्षेपाने हवालदिल झालेल्या अनेक शेतकऱ्यांनी पारंपरिक पिकांची शेती सोडून अपारंपरिक पिकांकडे आपला मोहरा वळवला आहे.
आज पारंपरिक शेतीत राम राहिलेला नाही. लहरी हवामान, सतत बदलत राहणारी सरकारी धोरणे यांमुळे गहू, तांदुळ, मका, कापूस, सोयाबीन यांसारख्या पिकांच्या लागवडीने शेतकऱ्यांच्या हातात फारसे काही लागत नाही. हे लक्षात घेत महाराष्ट्रातील अनेक शेतकरी आता नव्या पिकांकडे वळले आहेत. चंदन, औषधी वनस्पती, आंबा, साग, बांबू या नव्या अपारंपरिक पिकांची लागवड शेतकरी मोठ्या संख्येने करत असल्याचे चित्र दिसून येते. पारंपरिक शेतीचे प्रगत तंत्र ठाऊक असले तरीही केवळ पारंपरिक शेतीत सरकारचा नको तितका असलेला हस्तक्षेप, न परवडणारे हमीभावाचे गणित या साऱ्यांपासून पळ काढण्यासाठी शेतकरी शेतीचे फारसे तंत्र ठाऊक नसलेल्या औषधी वनस्पती आणि चंदन, बांबू, साग यांच्या शेतीकडे वळत आहेत. पारंपरिक शेतीत उत्पादन खर्च आणि मिळणारा दर हा शेतकऱ्याला परवडेनासा होतो आणि त्याचे नफ्याचे सारे गणित कोलमडून जाते. चांगले उत्पादन आले तर दर घसरतो आणि लहरी हवामानाने चांगले पीक आले नाही, तर कर्जबाजारी होण्याचा धोका, यांमुळे प्रामुख्याने विदर्भातील शेतकऱ्यांनी नव्या उत्पादनांकडे आपला मोहरा वळवल्याचे दिसून येत आहे. ही नवी पिके शेतकऱ्यांसाठी तितकीच जोखमीची आहेत. कारण या पिकांच्या मागणीने सध्या जोर धरला असला तरी या अपारंपरिक पिकांच्या शेतीचे तंत्र, या पिकांच्या जातींतील तफावत, या पिकांच्या शेतीतील स्पर्धा, या पिकांवर रोगजंतूंचा होणारा परिणाम, या पिकांचा जमिनीच्या कसावर होणारा परिणाम या साऱ्यांबद्दल अद्याप शेतकऱ्यांच्या मनातील शंका-कुशंका कायम आहेत. तरीही, पारंपरिक पिकांच्या शेतीतील सरकारचा अवाजवी हस्तक्षेप आणि ठरलेले आर्थिक नुकसान यांमुळे अपारंपरिक पीक लागवडीचा पर्याय महाराष्ट्रातील अनेक शेतकरी स्वीकारत आहेत.
चंदनाच्या पूर्ण वाढ झालेल्या एका झाडामागे उत्पन्नापोटी पाच ते दहा लाख रुपये मिळतात. मात्र, त्याकरता काही वर्षं प्रतीक्षा करावी लागते. चंदनासोबत साग, बांबू, औषधी वनस्पतींना असलेली मागणी लक्षात घेत शेतकरी या शेतीकडे वळत आहे. आपल्या जमिनीतच नव्हे तर प्लॉट्स विकत घेत त्यात ही पिके घेण्याकडे शेतकऱ्यांचा कल वाढत आहे.
याबाबत बोलताना शेतकरी संघटनेचे ज्येष्ठ कार्यकर्ते आणि शेती अभ्यासक प्रा. मानवेंद्र काचोले यांनी सांगितले की, ही पिके घेताना त्यातील अंत:प्रवाह अनेक शेतकरी लक्षात घेत नाहीत. महत्त्वाचे असे की, शेतीमध्ये समृद्धीची योजना इतक्या आधी आखता येत नाही. मधल्या वर्षांमध्ये तंत्रज्ञानामुळे कोणताही बदल होऊ शकतो. आज चंदनाला मागणी आहे, पण प्रगत तंत्रज्ञानाने ज्याप्रमाणे सिंथेटिक पुदिना आला, चीनने सिंथेटिक कस्तुरी बनवली, त्याप्रमाणे तंत्रज्ञानाकरवी चंदनाचे काही उत्पादन आले तर या शेतकऱ्यांचे आणि त्यांच्या समृद्धीच्या स्वप्नांचे काय होणार? काही शेतकरी भाजीपाला पिकवण्यावर भर देऊ लागले आहेत. निदान त्यातून तुलनेने लवकर पैसे हातात येतात. पण हेही मुंबईसारखी बडी मोठी बाजारपेठ नजीक असलेल्या नाशिक, पुणे येथील शेतकऱ्यांना शक्य आहे. त्या पल्याडच्या शेतकऱ्यांनी भाजीपाला पिकवला तरी त्यांना बाजारपेठ उपलब्ध नाही.
आपल्याकडे शेतीतील तंत्रज्ञानाच्या विकासाकडे अक्षम्य दुर्लक्ष केले जात आहे. तंत्रज्ञान उपलब्ध नाही. ते वापरू इच्छिणाऱ्यांकडे हवं तितकं ज्ञान नाही. त्याला माहिती देण्याकरता प्रशिक्षित कर्मचारीवर्ग नाही. अशा वेळेस शेतीत तंत्रज्ञानाचा वाढता वापर कसा काय करणार? आपल्या जाहिराती पाहिल्या तर औषधशास्त्रासंबंधित ९० टक्के जाहिराती या कांती उजळ करणे आणि केस काळे करणे यांवर असतात. अशा वेळी शेतकऱ्यांपर्यंत शेती तंत्रज्ञान पोहोचणार कसं? तंत्रज्ञानाच्या अभावी आपल्याकडे शेतीत सुमारे ९८ टक्के मजूर तंत्रज्ञानाने लवकर करता येतील, अशी निरर्थक कामे करत असतात. असे चित्र असताना कसे होणार आपण शेतीत प्रगत आणि कसे होणार आपले शेतकरी समृद्ध?
वर्षानुवर्षं शेतीच्या मूळ समस्या कायम ठेवत सवलती, कर्जमाफी यांसारखे मुद्दे चघळत ठेवण्यात राजकीय नेत्यांना रस असतो. दर वर्षी कर्जमाफी, सवलती दिल्याने राजकीय पक्षांची वोटबँक कायम राहते, करदात्यांच्या पैशांवर मते कमावण्याची संधी राजकारण्यांना मिळते. या सगळ्यात जोखमीचा असला तरी अपारंपरिक पिकांकडे वळण्याचा मार्ग शेतकरी नाईलाजाने स्वीकारू लागले आहेत.